एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य

Foto
मुंबई : देवेंद्र फडणवीस हे जर केंद्रात गेले तर एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. याबाबत विचारलं असता खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीही राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातच गेलं पाहिजे कारण महाराष्ट्र आता त्यांच्या हातात राहिलेला नाही अशीही टीका केली आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत मी हे शनिवारीही म्हटलं होतं. मी माझ्या मताशी ठाम आहे. एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला. हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर केला गेला. त्यांना फोडून त्याची बक्षिसी म्हणून मुख्यमंत्री केलं एवढंच. त्यांनी त्यांचं काम करुन झालं आहे. केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदींना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस एखाद्या खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत, आम्हाला तर वाटतं की १०० टक्के ते योग्य आहेत. कारण महाराष्ट्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेला नाही. महाराष्ट्रात गुंडाचं राज्य सुरु झालं आहे. फडणवीस जर केंद्रात गेले त्यांना अर्थखातं वगैरे मिळालं तर मग महाराष्ट्रात भाजपाचाच मुख्यमंत्री होईल. बाहेरचा मुख्यमंत्री होणार नाही. एकदा केलं त्यांना पक्ष फोडला म्हणून परत नाही करणार कारण ती भाजपाची परंपराच नाही. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे त्यांचा गट घेऊन जर विलीन झाले आणि सांगितलं की मी भाजपाईच आहे ओरिजनल. तुम्ही सगळे नंतर आलात, भाजपाची स्थापना मी केली. जसं ते म्हणतात ना शिवसेनेची स्थापना मी केली मी संस्थापक आहे. तसं उद्या ते भाजपात गेले आणि सांगितलं की भाजपाची स्थापना मी केली, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे माझे कार्यकर्ते होते. नरेंद्र मोदी कार्यकर्ते होते. अमित शाह कल का बच्चा. असं जर का ते म्हणाले तर कदाचित त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल. बाहेर राहून त्यांना काहीही मिळणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.